हॅलो हॅलो हॅलो माईक टेस्टिंग नाही मीच टेस्टिंग !
हॅलो हॅलो हॅलो
माईक टेस्टिंग नाही
मीच टेस्टिंग !
स्पेशल मास्कमधून
मास्क झालेला आवाज
आणि अनोळखी चेहरा घेऊन
पडद्याआड मीच आहे
विंगेत उभे सगळेजण, वाह!
ए ss अरे पण, माझ्या प्रिय पात्रांनो,
चिकटू नका न एकमेकांना
थोडे अंतर ठेवा !
पडदा ऑटोमॅटिक आहे
हात लावू नका
आपोआप उघडेल
कोरोना असेल चिकटून..
तिसरी घंटा कधीची वाजते आहे
ती संपण्याची वाट पाहा
तोवर विंगेतच खरेखुरे नाटक
चालू राहू द्या
अनेक वर्षे एकत्र राहून
आजच्या एकमेकांना आपण
ओळखत नसल्याने
जुनी बासी वेशभूषा
नेसून
आणि चेहऱ्यावर
ऍसिडीक भाजकी रंगभूषा
करून..
पोटातून तोंडात येतील ते
कडू गोड संवाद बोलू या
विसंवाद अटळ आहे
काळजी नको
तो मिटवण्यासाठी शस्त्रे आहेत
आणि ती खरी खुरी आहेत..
नाटकातली नाहीत..
मग ती वापरून झाल्यावर
शांतपणे
जुनेपुराणे पोपडे आलेले
सर्वांच्या सुखासाठी
सर्वांच्या शांततेसाठी
एखादे पवित्र गीत गाऊ या
मित्रांनो,
रिहर्सल आणि नाटक एकच आहे
तुमचा उत्स्फूर्त आवाज मी आहे
पडद्याआड मीच आहे
रंगमंचावर अद्याप अंधार आहे
आणि समोरच्या निबिडात देखील
कोणीही नाही!
घाबरू नका..
पण साली ही तिसरी घंटा
थांबतच नाहीये!
मोहन देस