तळपाय

किती तडफडलास !
राशन कार्ड लावो, आधार कार्ड लावो
इलेक्ट्रीक बील लावो
फक्त पसाभर धान्यासाठी ?
दिसली नाही त्यांना
तुझ्या डोळ्यांतील आदिम भूक ?
अन् इतके कठीण असते
कामगार -मजुरांना ओळखणे ?

तुला भिकारी समजत
दोन केळी हातावर ठेवून
चार चार जणांचे
फोटो छापून आणले त्यांनी
आणि तू उदारा ! म्हणत राहिलास
मालक भी क्या करेगा साहाब !
उनकी भी तो आमदानी बंद है …

आत्ता या वेळी, या पावसात
अपरात्री वादळवाऱ्यात
शिणलेली गात्रे,
भेदरलेली बायकापोरे घेऊन
कुठल्या रस्त्याच्या कडेला
थांबला असशील तू ?
डाव्या बाजूला गरिबीचे दाट जंगल
उजव्या बाजूला विकासाचा भरधाव ट्रक
स्वतःच्या घरी सुखरूप पोहचेपर्यंत
जिवंत राहशील ना तू ?

लॉकडाऊनचा असा
अवकाळी अनिश्चित पाऊस
तुझ्या आयुष्यावरच कोसळला
मुळासकट मोडले तुझे बिऱ्हाड
खांद्यावर भुकेलेली मुलगी
वृद्ध आई पाठीवर
सोबत सहवेदनेचा तांडा
तळपाय झिजवत झिजवत
अन् फाटक्या चपला ओढत
किती चालला असशील
आज दिवसभर ?

किती चालशील आणखी ?
जिथे पोहचलो आहोत आम्ही
आपापले हिशेबी लक्ष्य गाठत
तिथे कसा आणि केव्हा
पोहचशील तू ?

गावाईच्या कुशीत शिरण्यासाठी
रणरणत्या उन्हातून
पायपीट करताना आठवत असशील
कोरोनाच्या भीतीने घरात लपून बसलेले
हे अप्पलपोटे शहर
तुला बेवारस ढकलून देत
उपासमारीच्या खाईत

आठवत असतील
येथील सुखवस्तू जगाच्या
पायव्यात चिणली गेलेली
तारुण्याची सारी स्वप्ने
महत्त्वाकांक्षेच्या गारगोट्यांनी
ठेचलेले पौरुष अन्
अतिश्रमात ते एकाकी कन्हणे

तुझी ओळख मिटवणाऱ्या
या अमानुष शहराने
नष्ट केले आहे तुझ्या हसण्यातले माधुर्य
तुझ्या स्नायूंवर दिला प्रचंड ताण
जोर लगाके हय्या …म्हणत
तिकडे तू उरी फुटायाचास
अन् इकडे चालायची
नफ्यातोट्याची गणिते !

शहरपुरुषाच्या जगण्याचा पसारा
सांभाळण्यासाठी अष्टौप्रहर
राबते ठेवलेले तुझे हातच कापून टाकले
या महाभयंकर करवतीने ;
शहरगाडा हाकणारी तुझी यंत्रे-
अवजारे जप्त केली बेमुर्वतपणे ;
आणि तूच बांधून दिलेल्या शहरानेही
तुला केले निर्वासित
भूक घेऊन आलास अन्
भूक घेऊनच निघूनही गेलास

संपूर्ण भारतातील रस्त्यारस्त्यांवर
अकस्मात उतरलास तू
आपली विविध रूपे घेऊन
त्या तुझ्या विश्वरूपदर्शनाने भांबावून
काळालाच आली ग्लानी ;
आणि जन्मल्या प्रवासाच्या
नवनव्या वैफल्यकथा

गर्भात नऊ महिन्याचे भविष्य घेऊन
तुझी गरोदर बायको
कधी तुझ्यासोबत ३४१ किलोमीटर
चालत राहिली
आत्मनिर्भर होऊन
कधी तुझ्या पोटावरून धडधडत
आरपार निघून गेली बेमुर्वत ट्रेन
व्यवस्थेच्या हिंस्त्रपणाचे
क्रूर दर्शन घडवत

हे वर्तमाना ! जपून ठेव
देशभर इतस्ततः पसरलेल्या
छिन्नविछिन्न तुटलेल्या देहांसोबतचे
हे अगणित तळपाय ; आणि
प्रत्येक हातात घट्ट धरलेली भाकर
साठवून ठेव डोळ्यांत तुझ्या
सामूहिक आत्महत्येची
ही ख्रिस्तव्याकुळ
भयभीषण मरणशैली !

तुझ्या तळपायातील
लालभडक जखम आठवून
तुझ्या घामाच्या सुगंधाचे
वृथा कौतुक करणारी
माझी कविता खजील झाली आज.

आता कळते मला की,
माझी करुणा बेगडी आहे
माझा कळवळा निरर्थक आहे
माझी बडबड व्यर्थ आहे
माझी कृती शून्य आहे
माझी संवेदनाही मुर्दाड आहे
आता किमान माझ्या मनातली
वेदना तरी जिवंत राहू दे

दररोज पोटभर जेवताना
ते वायजाळलेले बथ्थड हात
ते वाळलेले निर्जीव डोळे
ते खप्पड गाल अन्
ते भेगाळलेले तळपाय
सतत आठवण्याचा
शाप मला दे !

निपचित पडलेल्या
या शून्य काळात अंगभर जिरून
सुकून गेलेल्या तुझ्या घामात
माझे हे ‘कृतक ‘ असले तरी
‘माणसा’ चे म्हणून अश्रू
एकजीव होऊ दे

या मानवी संकटातून अगतिक
‘आपण सारे ‘ मुक्त झाल्यावर
उद्या तू परत येशील तेव्हा
शोषणाचे नवनवे संदर्भ अन्
उपेक्षेचे सूक्ष्मार्थ सर्वांना कळू देत
कळू दे तुझ्या पृथ्वी तोलून धरलेल्या
तळहाताचे मोल !

तू परत आल्यावर
स्वच्छ धुतलेल्या नजरेने
तुझ्या सुखदु:खांकडे
पाहू शकेन मी
असे तुझ्याएव्हढे
माणूसपण मला दे
अन् तुझ्या स्वाभिमानाचे
खरे मूल्य कळेल असे तुझ्यासारखे
शहाणपण मला दे

तू परत येईपर्यंत समजून घेऊ
तुझ्या उन्नयनाच्या पायऱ्यांची
आयडियॉलॉजी गंभीरपणे
हळूहळू तुझ्या श्रमाला अॅकनॉलेज
करायला शिकू आम्ही
तोपर्यंत माझ्या काळीजतळातली
ही लाल जखम अशीच
ठसठसत राहू दे !

तीर्थराज कापगते

 

Download pdf

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *